If earth could speak essay in Marathi नमस्कार मित्रहो आपण जर पृथ्वी बोलू शकली असती तर या विषयावर निबंध शोधत अहात का? आम्ही यावर निबंध सांगितलं आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग सुरु करू या.
जर पृथ्वी बोलू शकली असती तर If earth could speak essay in Marathi
दिवाळीची सुट्टी लागली होती त्यामुळे आम्ही दररोज संध्याकाळी क्रिकेट खेळण्यासाठी शाळेनजीकच्या मैदानावर जायचो. एके दिवशी क्रिकेट खेळून झाल्यानंतर आम्ही मित्र तिथेच गप्पा मारत बसलो होतो. अंधार पडत चालला होता, पक्षांचे थवे परतीचा प्रवास करताना दिसत होते तिथेच जवळ असलेल्या कचरा डेपोचा दुर्गंध अधून मधून येतच होता.
आमची चेष्टा मस्करी चालू असताना अचानक आम्हाला कोणाचातरी आवाज येऊ लागला, तो आवाज आमच्यापैकी नव्हता. आम्हाला आश्चर्यचकित झालेले पाहून तो आवाज पुन्हा येऊ लागला की “बाळांनो मी पृथ्वी बोलतेय.” असे ऐकल्यावर आमच्या भुवया अजूनच उंचावल्या होत्या.
पृथ्वी बोलू शकेल यावर आमचा कोणाचाच विश्वास बसत नव्हता. शेवटी पुन्हा एकदा तिनेच आम्हाला खात्री करून दिली व आम्हीही तिला कुतुहलाने अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. आम्ही तिच्या आजवरच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दर्शवली.
त्यावर तिने तिचा आजवरचा प्रवास थोडक्यात सांगण्यास सुरुवात केली. ती म्हणाली,”बाळांनो, मी तुमची वसुंधरा माता, माझा जन्म फार पूर्वीच झाला. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा मी सुद्धा सूर्याइतकीच तप्त व प्रखर होते. त्यानंतर कालांतराने माझा पृष्ठभाग हळूहळू थंड होत गेला व त्यानंतर काही काळाने माझ्यावर जीवसृष्टी निर्माण होत गेली व लाखो प्रजातीचे विविध सजीव माझ्यावर वास्तव्य करीत आहेत.
अगदी बरेच वर्षं सर्व काही सुरळीत चालले होते पण त्यानंतर माणसांच्या मागण्या वाढत गेल्या, त्या मी वेळोवेळी विविध स्वरूपात पुर्ण केल्या पण समाधानी असेल तर तो माणूस कसला! त्याने माझ्याकडे होते नव्हते ते सर्व ओरबाडून घ्यायला सुरुवात केली. विविध खनिजे, इंधने, धातू अशा अनेक गोष्टी भविष्याचा विचार न करता माझ्याकडून मिळवत राहिला.
आता माझ्याकडे असणारा इंधनाचा साठा काही वर्षातच संपुष्टात येईल. मला माझी चिंता नाही पण माणसांच्या भविष्यातील पिढ्यांना मी काही देऊ शकणार नाही या गोष्टीची खंत मला वाटत राहते.
पूर्वी माझ्यावर लाखो वृक्षांच्या प्रजातींनी नटलेली सुंदर जंगले होती. पण माणसांच्या दृष्टीतून तेही वाचू शकले नाहीत, माणसाने लाकडांसाठी, शेतीसाठी, जागेसाठी जंगले नष्ट केली, सृष्टी सौंदर्याने नटलेल्या सुंदर जंगलांचा ऱ्हास करून सिमेंट काँक्रीटची जंगले म्हणजेच शहरे उभी केली.
माणसाच्या हव्यासापोटी माझ्यावरील कित्येक जंगली प्रजाती नष्ट झाल्या आणि अजूनही अनेक प्राण्यांच्या व झाडांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.एवढं करूनही हा माणूस इतक्यावर थांबला नाही तर वातावरण दूषित करणारे प्रदूषके त्यांने उभारलेल्या कंपन्यांमधून सोडू लागला. पण या गोष्टीचा माणसानंसोबत इतरांनाही त्रास सहन करावा लागला.
विविध प्रकारची श्वसनासंदर्भातील आजार ही या धुरातील प्रदूषकांमुळे निर्माण झाली.
त्याने सोडलेले हरितगृह वायू वातावरणामध्ये उष्णता रोखून धरतात व त्यामुळे माझ्या सभोवतालचे तापमान हे वाढत चालले आहे व यामुळे बर्फाळ प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच या वाढणाऱ्या तापमानामुळे अनेक प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पृथ्वीवरील झाडांचे आच्छादन नष्ट केल्यानंतर पावसाची अनियमितता वाढत गेली पण त्यानंतर त्याला त्याचा चुकीची जाणीव झाली आणि त्याने वृक्षारोपण करायला व उर्वरित जंगलाचे संवर्धन करण्याची सुरुवात केली, ही जमेची बाब आहे.
शेतकऱ्यांनी सुद्धा माझ्याकडून जास्त उत्पन्न घेण्यासाठी विविध रासायनिक खतांचा वापर केला, त्यातून त्याला मनासारखे उत्पन्नही मिळाले पण त्यामुळे आता मात्र त्या जमिनीची पीक घेण्याची क्षमता निघून गेली आणि नापीक झाली.
सध्या माझ्यावरील भारही खूपच वाढत चालला आहे त्यामुळे कधीकधी मलाही तो पेलवत नाही आणि मग अनेक आपत्तींमधून मी ते व्यक्त करत असते.विकासमागे धावताना तुम्ही माझं आणि इतर सजीवांच तर नुकसान केलं आहे पण आता स्वतःच स्वतःच्या विनाशासाठी कारण होऊ नका हीच विनंती.” असं बोलून तो आवाज शांत झाला.
पृथ्वीचे मनोगत ऐकून आम्ही भारावून गेलो होतो आमच्याच पूर्वजांनी व आम्ही सुद्धा स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी सृष्टीचे खूप नुकसान केले, याची आम्हाला जाणीव झाली होती.
मैदानावर आता खूपच अंधार पडू लागला होता. आम्ही आता घराकडे जायला निघालो पण निघताना मनातच एक निर्धार पक्का केला की, आमच्यात सृष्टीचे संवर्धन करण्याची कुवत नसली तरी तिचा र्हा होऊ नये यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू.